बातमी कट्टा:- तापी नदीपात्रात अवजड वाहन कोसळल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून चालकाचा शोध लागत नसल्याने आज दि २७ रोजी सकाळी आठ वाजेपासून एनडीआरएफ पथकाकडून तापी नदीपात्रात शोध कार्य सुरु असतांना दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास पाण्यात बुडालेल्या चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या पथकाला यश प्राप्त झाले आहे.
दि २३ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर ०९ एफ ए ६४८७ क्रमांकाची क्रुझर वैजापूर येथून मजूर घेऊन जात असतांना अचानक टायर फुटल्याने क्रुझर पुलावर पलटली होती मात्र क्रुझर मागून येणाऱ्या ट्रकचा तोल जाऊन ट्रक थेट तापी पुलाचे कठडे तोडून तापी नदीत कोसळली होती.
घटनेच्या चार दिवसानंतर एनडीआरएफची तुकडी शिरपूर येथे रात्री दाखल झाली होती आज सकाळी आठ वाजे पासूनच एनडीआरएफच्या पथकाकडून या तापी नदीत बुडालेल्या वाहनाचा व त्यातील चालकाचा शोध सुरु करण्यात आला.यात दोन बोटींमध्ये एकुण दहा कर्मचारी दाखल झाले आहेत. यात दोन जण (डीप ड्रायव्हर)डिप डाईव्हींग (ऑक्सिजन सिलेंडर) सेट घेऊन थेट चाळीस ते पन्नास फुट खाली पाण्यात जाऊन प्रत्यक्षदर्शी वाहनाचा शोध घेत असून सुमारे पाच ते सहा तास शोध घेऊन देखील दुपारी २ वाजेपर्यंत वाहनाचा योग्य पध्दतीने शोध लागू शकलेला नव्हता. जवळपास पाच ते सहा तासांत दोन ते तीन वेळा पाण्याच्या आत शिरून शोध घेण्यात येत होता. अखेर पुन्हा शोधकार्य दरम्यान ३५ ते ४० फुट खोल पाण्यात शिरून चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
तब्बल सात ते आठ तासापर्यंत एनडीआरएफचे २५ जवानांकडून पाण्यातील मृतदेह काढण्यासाठी संघर्ष सुरु होता अखेर अत्यंत किचकट परिस्थितीतून चालकाचा मृतदेह बाहेर काढत शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला.पाण्यात असलेले वाहन बाहेर काढणे शक्य नसल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.घटनास्थळी दिवसभरा पासून शिरपूरचे प्रांताधिकारी प्रमोद भामरे,तहसीलदार आबा महाजन आणि पोलीस निरीक्षक ए.एस आगरकर उपस्थित होते.