कारवाई की देखावा ? एकच सवाल संपादक ज्ञानेश्वर थोरात यांच्या लेखनीतून

शिरपूर शहर पोलिसांनी अवैध हातभट्टी दारू निर्मितीच्या अड्ड्यांवर मोठी कारवाई केली. पोलिसांच्या त्या कारवाईचे कौतुक आहे परंतु …त्यानिमित्ताने जनतेचा एकच सवाल आहे ?
शहर पोलीस ठाणे ,तालुका पोलीस ठाणे ,थाळनेर पोलीस ठाणे हद्दीत समावेश असलेल्या जवळपास कित्येक गावांमध्ये अवैध गावठी दारू, ताडी, गांजा,गुरांची अवैध वाहतूक यांची विक्री राजरोसपणे सुरू आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत परवाने नसताना अनेक हॉटेल व्यावसायिक मद्यविक्री करत आहेत. तालुक्यात अवैध धंद्याचा देखील सुळसुळाट सुरू आहे. गुटखा, दारूची अवैध विक्री, नशेखोरीचे प्रकार आणि त्यातून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सामान्य नागरिकांना या अवैध धंद्यांचा त्रास होत आहे, मात्र संबंधित व्यावसायिक आणि पोलीस यांचे संगणमत असल्याने याबाबत तक्रार करायची कोठे? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. तसेच अवैध व्यावसायिकांची दहशत असल्याने नागरिक तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. अवैध धंदे रोखण्याऐवजी त्यांच्याकडून पैसे घेतले तर पोलिसांची समाजातील प्रतिमा मलिन बनते. वास्तविक, सर्वच पोलिस खराब नाहीत मात्र सर्वच कर्तव्य दक्ष आणि प्रामाणिक हि नाहीत असे हि नेहमी बोलले जाते
शिरपूर तालुक्यात सर्वत्र जुगार,मटका अड्ड्यांमुळे तरुण वर्ग सावकारी कर्ज घेऊन उध्दवस्त होवून आत्महत्या सारखे मार्ग अवलंबत असल्याने अवैध धंदे तसेच अवैध सावकारी व्यावसायिकांवर कार्यवाहीचा बडगा उगारला जाण्या ऐवजी अवैध धंद्यांना मुभा दिले जात असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. अवैध धंदे बंद करण्याबाबत नागरिकांनी ओरड करुन देखील पोलिस प्रशासनाच्या कानापर्यंत तो आवाज जात कसा नाही? हा मोठा संंशयाचा विषय ठरला आहे. पोलिस प्रशासनाला जनतेचा आवाज जात नाही कि स्वत:हून ते कान बंद करुन घेतात हा देखील संशोधनाचा विषय ठरत आहे. तालुक्यात नुकतीच शहर पोलिसांनी १३ ठिकाणी गावठी हातभट्टी च्या दारू वर कारवाई केली खरी मात्र या कारवाईने त्या हातभट्ट्या पुन्हा सुरु होणार नाहीत काय ? हातभट्ट्यांवर कारवाई करण्यापेक्षा गावठी दारू निर्मितीसाठी होलसेल दारू निर्मितीचा गुड,महू विक्री करणाऱ्या होलसेल व्यापाऱ्यांवर कारवाई होणे नागरिकांना अपेक्षित आहे, कारण निर्मितीचा सोर्सकडे पोलिसांनी अर्थपूर्ण दुर्लक्ष केले असल्यामुळे हातभट्ट्या तर पुन्हा लागणारच अशी चर्चा आहे तर तालुक्यात सरार्सपणे आजही अवैध धंदे जोमाने सुरु असल्याची प्रचिती तालुक्यातील अनेक गावाकडे बघिल्यावर लक्षात येते. शहरातील सुंदरवाडी भागात अशी परिस्थिती असेल तर तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये सुरु असलेल्या अवैध धंद्याबाबत चर्चा न केलेली बरी ! दरम्यान पोलिस प्रशासन व अवैध धंद्यावाल्याचे दोस्ती केव्हा तुटणार ? असा सवाल ग्रामीण भागातून विचारला जात आहे. तालुक्यात अवैध जुगार व्यवसायाची चक्रे जोमाने सुरू असून या जुगार अड्डामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. तरुणांसोबत शालेय विद्यार्थी देखील जुगाराचे आकडे लावण्यासाठी आणि पत्ते खेळण्यासाठी उत्सुक झाले असून विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाकडे न वळता जुगारी मार्गाकडे वळण्याचे आवाहन नकळत संबंधित पोलीस प्रशासनामार्फत केले जात असल्याचा प्रकार समोर येत आहे.
धुळे जिल्ह्यातील शांत,सुंदर व सुरक्षित शहर म्हणून शिरपूर शहर ओळखले जाते. परंतु, अलिकडे वाढत असलेली गुन्हेगारी पाहता ही ओळख पुसली जातेय की काय अशी भिती निर्माण होऊ लागली आहे. शहरात दिवसाढवळ्या घरफोड्या, सोनसाखळी, मोबाईल, वाहनचोर्‍या आणि रात्री जबरी चोरीचे गुन्हे घडू लागले आहेत. सीमेलगत भागात मोठ्या प्रमाणात शास्र साठा जप्त करण्याच्या कारवाया सतत सुरु आहेत, हाणामार्‍या तर नित्याचाच झाल्या असून एकामागे एक घडणार्‍या खूनांच्या मालिकेने गुन्हेगारीचा आलेख शिखरावर नेला आहे.डिटेक्शन इज बेस्ट प्रिव्हेन्शन’ हे गुन्हेगारी रोखण्याचे तत्व आहे. पण, यामध्येच पोलीस कमी पडताना दिसत आहेत. वाहनचोरांनी कहरच केला असून कॉलनी भागातून घराच्या समोरून वाहने चोरीला जाण्याचे प्रमाणही वाढलेले आहे. शहरात दिवसाढवळ्या चाकूने भोसकून खून केला जातो , एवढी हिम्मत लोकांना येते कुठून कायद्याचा धाक कोणाला राहिला नाही का ? मात्र त्यामुळे गुन्हेगारांतील खाकीची दहशत कमी होऊन सर्वसामान्य नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याचं विदारक चित्र आहे.
यामध्ये आणखी एक माहिती अशी की या अवैध धंद्यांच्या पार्श्वभूमीवर संबंधित पोलीस ठाण्याचे अज्ञात कर्मचारी मोठ्या प्रमाणात हप्ते वसूल करण्यात मग्न असून त्यांना त्यांच्या प्रमुख कर्तव्यांचा विसरच पडला असल्याचे समजते आहे. अवैध धंदे चालतात ते वरिष्ठ कार्यालयापासून याची साखळी असते. त्यांना देखील हप्ता चालू असल्याने कुणीही किती ओरड केली तरी अवैध धंदे बंंद होणार नाही, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरु असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून पोलिसांच्या कार्यपध्दतीवर शंका उपस्थित होत आहे. अवैध धंद्याविरुध्द बोलल्यास गुंडप्रवृत्तीचे अवैध धंदे चालक पोलिसांच्या मदतीने दमदाटी करतात असा देखील आरोप होत आहे. तरी तालुक्यात फोफावलेल्या अवैध धंद्यांची तक्रार थेट पोलीस अधीक्षक धुळे यांच्या पर्यंत पोहचली आहे यावर पोलीस अधीक्षक काय भूमिका घेतात हे बघणे आता महत्त्वाचे ठरेल.

अँड ज्ञानेश्वर थोरात
संपादक – दैनिक एकच सवाल, मो.98504 86435

WhatsApp
Follow by Email
error: