कोरोनाच्या ‘ओमायक्रॉन’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने अधिक सतर्कता बाळगावी! जिल्हाधिकारी जलज शर्मा

बातमी कट्टा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपुष्टात आलेला नसतानाच आता त्याचा नवा प्रकार ‘ओमायक्रॉन’चे रुग्ण राज्यात आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने अधिक सतर्कता बाळगावी. कोरोना विषाणूच्या चाचण्यांची संख्या वाढवितानाच ऑक्सिजन प्रकल्पांची तातडीने पूर्तता करावी. जिल्ह्यातील प्रत्येक पात्र नागरिकाचे लसीकरण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जलज शर्मा यांनी आज येथे दिल्या.


जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज दुपारी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त देवीदास टेकाळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे (शिरपूर), उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील (प्रशासन), डॉ. अरविंद अंतुर्लीकर (निवडणूक), सुरेखा चव्हाण (भूसंपादन), जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचे डॉ. निर्मल रवंदळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महेश भडांगे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर आदी उपस्थित होते.


जिल्हाधिकारी श्री. शर्मा म्हणाले, कोरोना विषाणूच्या ‘ओमायक्रॉन’ या नव्या प्रकारामुळे दक्षता घेणे आवश्यक आहे. आरोग्य विभागाने कोविड केअर सेंटर, कोविड केअर हेल्थ केअर आणि कोविड केअर हेल्थ हॉस्पिटल अद्ययावत करून घ्यावे. तेथे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तातडीने नियुक्ती करावी. अतिदक्षता विभाग, व्हेन्टिलेटरची तपासणी करून संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण करून घ्यावे. आवश्यक यंत्रसामग्री, ऑक्सिजन, औषधाचा पुरेसा साठा राहील याचे आतापासूनच नियोजन करावे. ऑक्सिजनचा किमान 24 तास पुरेल एवढा साठा राहील, असे नियोजन करतानाच त्याच्या तांत्रिक बाबींची तपासणी करून घ्यावी. तसेच वाहतूक आराखडाही तयार करावा.
विदेशातून धुळे जिल्ह्यात आलेल्या नागरिकांच्या संपर्कात राहून त्यांच्यासह त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या चाचण्या करून घ्याव्यात. केंद्र सरकार व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही करावी. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या दुपटीने वाढवावी. त्यासाठी आवश्यक कीटची तातडीने मागणी नोंदवावी. शहरी व ग्रामीण भागात फिव्हर क्लिनिक कार्यान्वित करावेत. या क्लिनिकमध्ये कोरोना विषाणू सदृश आजाराची व्यक्ती आल्यास तातडीने आरोग्य विभागाला माहिती उपलब्ध करून द्यावी. त्याबरोबरच जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावा. नागरिकांनी कोविड अनुरुप वर्तन, मास्कचा नियमितपणे वापर आणि शारीरिक अंतर पाळणे आवश्यक आहे. त्यासाठी महानगरपालिका आणि पोलिस दलाने संयुक्तपणे पथके गठित करून ठिकठिकाणी तपासणी करावी. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू करावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी दिले.
धुळे जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी शहरी भागासह ग्रामीण भागात जनजागृती करावी. नागरिकांनी पहिला डोस घेण्यासाठी लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी. लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त करावे. घरोघरी जावून नागरिकांचे लसीकरण करून घ्यावे, अशाही सूचना जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी दिल्या.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. यांनी सांगितले, जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींचे सहकार्य घेतले जाईल. तसेच गावागावांत जनजागृती करण्यात येत आहे. पोलिस अधीक्षक श्री. पाटील यांनी सांगितले, कोविड अनुरुप वर्तन आणि नागरिकांनी नियमितपणे मास्क वापरावा म्हणून महानगरपालिकेच्या सहकार्याने पोलिसांची पथके गठित करण्यात येतील. ही पथके गर्दीच्या ठिकाणी तैनात करण्यात येतील. महानगरपालिका आयुक्त श्री. टेकाळे यांनी सांगितले, कोविड- 19 लसीकरणासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. लसीकरणासाठी लोकप्रतिनिधी, स्वंयेसवी संस्थांची मदत घेण्यात येत असल्याचे सांगितले. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल पाटील यांनी धुळे जिल्ह्यातील कोरोना विषाणूची सद्य:स्थिती याविषयी सविस्तर माहिती दिली.

WhatsApp
Follow by Email
error: