बातमी कट्टा:- घातक रेडिएशनसह विविध समस्यांना कारणीभूत ठरलेला दहिवद येथील एअरटेल कंपनीचा मोबाईल टॉवर हटवावा अशा मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले असून सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांना त्यांनी निवेदन दिले.
दहिवद गावात असलेल्या टॉवरबाबत दीर्घ काळापासून तक्रारी आहेत. टॉवर उभारल्यानंतर त्याच्या आजूबाजूच्या परिसरात कोणतीच देखभाल झाली नाही. परिणामी तेथे घाणीचे साम्राज्य तयार झाले आहे. त्याबाबत संबंधित तंत्रज्ञाकडे वारंवार तक्रारी करूनही उपयोग झाला नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आता गावात टॉवर नकोच अशी भूमिका घेतली आहे.
15 नोव्हेंबरला ग्रामस्थांनी सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यात म्हटल्यानुसार, दहिवद गावातील रहिवासी वस्तीत एअरटेल कंपनीचा मोबाईल टॉवर आहे. सुरक्षाविषयक नियमांची कोणतीच काळजी न घेता हा टॉवर उभारला गेला असल्याने परिसरातील रहिवाशांना त्यापासून जीविताला धोका संभवतो. टॉवरच्या परिसरात स्वच्छता राखण्याची जबाबदारी पार पाडली जात नसून त्यामुळे डास, चिलटे वाढून अनेक गंभीर आजार फैलावतात. या टॉवरसाठी वापरल्या जाणाऱ्या जनरेटरच्या आवाजाने परिसरातील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. टॉवरमुळे रेडिएशन वाढून बालकांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होत आहेत. हा टॉवर हटवून गावाबाहेर न्यावा व ग्रामस्थांची असुविधा दूर करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देतांना ग्रामपंचायत सदस्य मयूर पाटील, राजेंद्र रणदिवे, लक्ष्मीकांत पाटील, गणेश पाटील, कमलबाई पाटील, आशा बोरसे, किशोर बोरसे, डॉ. डी. यू. पाटील, अनिल पवार, पुष्पा पाटील, निळकंठ पाटील, जितेंद्र पवार, सुवर्णा पवार, ललित पाटील, भगवान पाटील, धाकलू गवळी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.