बातमी कट्टा:- शेतातील कुडाच्या घराला अचानक आग लागल्याने संपूर्ण घर जळून खाक झाल्याची घटना आज दि २१ रोजी सकाळच्या सुमारास घडली.यात घरसंसार उपयोगी साहित्यांसह कापूस व ६० ते ७० हजारांची रोकड जळून खाक झाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील बोरगाव शिवारात हिंगोणी येथील गोपाल छबिलाल पाटील यांच्या मालकिची शेतजमीन असून त्यांची शेती विक्रम नाना शेलाने,(पावरा) हे कसत होते.त्याच शेतात कुडाचे घर करुन विक्रम पावरा हे कुंटूबांसोबत वास्तव्यास होते.
आज दि २१ रोजी विक्रम पावरा हे आपल्या कुटूंबासोबत काम करत असतांना घराला अचानक आग लागली.काही क्षणात आगीने संपूर्ण घराला पेट घेतला.घरात कापूस साठवून ठेवण्यात आला होता.तर हरभरे विक्रीचे ६० ते ७० हजारांची रोकड ठेवलेली होती.आगीत सर्व घरसंसार उपयोगी साहित्यांसह रोकड व कापूस जळून खाक झाला.डोळ्यादेखत संपूर्ण जळून खाक झाल्याने कुटूंबीयांनी एकच आक्रोश केला.घटनेची माहिती मिळताच बोरगाव व हिंगोणी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.मात्र तोवर उशीर झाला होता. जेमतेम शेतीच्या उत्पन्नातून संसाराचा गाडा खेचत असतांना अचानक लागलेल्या आगीत सर्व काही जळून खाक झाल्याने गाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
झोपडी व आतील सर्व जीवनाश्यक वस्तू जळून खाक झाले असतांना देखील मंडळ अधिकारी व तलाठी यांनी पिकांचे नुकसान झाले नाही म्हणून कुठलिही नुकसान भरपाई मिळणार नसल्याचे सांगितले. मग गरीब मजुराला नुकसान भरपाई मिळेल कशी? असे बोरगांव सरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया यांनी तहसील प्रशासनाला जाब विचारला आहे.
योगेंद्रसिंग सिसोदिया
सरपंच ग्राम पंचायत बोरगांव