बातमी कट्टा : तापी नदीवरील हातनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने तापी नदीला मोठ्या प्रमाणात पूर येऊन धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे, असे पाटबंधारे विभाग, जळगाव येथील कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे. त्यामुळे तापी नदी काठावरील धुळे जिल्ह्यातील रहिवाशांनी सतर्क राहून सावधानता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
आज 2 सप्टेंबर 2021 रोजी हातनूर धरणावरील पाणलोट क्षेत्रामध्ये सरासरी 24 मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. त्यामुळे तापी नदीला मोठ्या प्रमाणात पूर येऊन हातनूर धरणांमधून पाणी सोडावे लागणार आहे. तापी नदीकाठावरील सर्व नागरिक व सर्व शासकीय यंत्रणांनी सावध राहावे. नदी काठावरील गावातील लोकांनी तापी नदी पात्रांमध्ये जावू नये तसेच आपली गुरे-ढोरे नदीच्या पाण्यात उतरवू नयेत. जीवितहानी व वित्तहानी टाळण्यासाठी सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. तसेच सर्वांनी आपली काळजी घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.