बातमी कट्टा:- मित्रांना भेटण्यासाठी गेलेल्या तरुणाची सावळदे तापी नदीपुलावर मोटरसायकल आढळून आली होती.आत्महत्या केली असावी असा संशय असल्याने शोध सुरु असतांना त्या तरुणाचा तापी नदीपात्रात हातपाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.या घटनेमागे घातपाताचा संशय व्यक्त होत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार चोपडा तालुक्यातील अनवर्दे बु. येथील स्वप्नील केशव पाटील हा 27 वर्षीय तरुण गेल्या एक वर्षांपासून इंदौर येथे औषध कंपनीत कार्यरत होता.कानबाई उत्सवाच्या रोटसाठी दि 27 जुलै रोजी स्वप्नील पाटील हा इंदोर येथून आपल्या अनवर्दे गावी आला होता. दुसऱ्या दिवशी दि 28 रोजी भाऊची मोटरसायकल (एम.एच 19 डिसी 4110) घेऊन स्वप्नील पाटील मित्रांना भेटण्यासाठी गेला होता.मात्र तो त्यानंतर घरी परतला नसल्याने या बाबत त्याच्या वडीलांनी चोपडा पोलीस स्टेशनात बेपत्ता बाबत नोंद केली.त्याचा सर्वत्र शोध घेत असतांना दि 29 रोजी त्याच्याकडे असलेली एम एच 19-4110 क्रमांकाची होंडा डिलक्स कंपनीची मोटरसायकल तापी नदी पुलावर आढळून आली.तापी पुलावर मोटरसायकल मिळुन आल्याने स्वप्नील पाटील याने तापीत आत्महत्या केल्याचा संशय नातेवाकांकडून व्यक्त करण्यात आला.यामुळे तापीनदीपात्रात नातेवाईकांकडून त्याचा सर्वत्र शोध घेण्यात येत असतांना त्याचा दि 30 रोजी शिंदखेडा तालुक्यातील तापी नदीपात्रातील सुलवाडे ब्यारेज नदीपात्रा जवळ हात आणि पाय बांधलेल्या अवस्थेत स्वप्नील पाटील याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली.घटनास्थळी शिंदखेडा पोलीस स्टेशनचे सा.पोलीस निरीक्षक प्रशांत गोरावडे, व पोलीस उपनिरीक्षक पि आर कोदार,गुरुदत्त पानपाटील यांच्यासह पोलीस पथक दाखल झाले.
स्वप्नील पाटील याने आणलेली मोटरसायकल सावळदे तापी पुलावर आढळली आणि शिंदखेडा तालुक्यातील सुलवाडे तापी पात्रात स्वप्नील याचा हात आणि पाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. स्वप्नीलने आत्महत्या केली की त्याचा घातपात झाला याबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे.संशयितरीत्या मृतदेह आढळल्याने मयत स्वप्नील याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शिंदखेडा येथे न दाखल करता धुळे येथे रवाना करण्यात आला होता.या घटनेबाबतची नोंद शिंदखेडा पोलीस स्टेशनात करण्यात आली आहे.