“देव तारी त्याला कोण मारी”, आत्महत्येसाठी त्याने तापीत मारली उडी,पोलीसांनी…

बातमी कट्टा:- देव तारी त्याला कोण मारी ही म्हण सार्थ ठरावी अशी एक घटना आज दि ४ रोजी घडली आहे. २३ वर्षीय तरुणाने आत्महत्येसाठी सकाळी ७ ते ८ वाजेच्या दरम्यान पुलावरुन तापी नदीपात्रात उडी घेतली होती.उडी घेतल्यानंतर वारंवार हातपाय हालवत राहिला व पुलाच्या खांब जवळील पिलर वर जाऊन पोहचला.पोलीस नागरिक आणि मच्छीमारांनी अखेर त्याला सुखरूप बाहेर काढले. जवळपास ६ ते ६:३० तास तो नदीपात्रात होता.

मिळालेल्या माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथील शेखर हरी भिल या २३ वर्षीय तरुणाने आज दि ४ रोजी सकाळी ७ ते ८ वाजेदरम्यान मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सावळदे गावाजवळील तापी पुल गाठला. आत्महत्या करण्यासाठी शेखर भिल याने तापी नदीपात्रात उडी घेतली.पाण्यात बुडत असल्याने तो स्वताला वाचवण्यासाठी पाण्यात हातपाय मारत राहीला.ही घटना पुलावरुन ये जा करणाऱ्या काही प्रवासींना समजली.त्यांनी तात्काळ नरडाणा पोलीस स्टेशनचे पोलीस भरत चव्हाण यांना संपर्क साधत तरुण पाण्यात बुडत असल्याचे सांगितले. घटनेची माहिती प्राप्त होताच घटनास्थळी शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस रोकडे व ईशी हे भरत चव्हाण यांच्या सोबत तापी पुलावर दाखल झाले.त्यांनी पुलावरुन शेखर भिल याला पाण्यात हातपाय मारत राहण्याचे सांगितले व सावळदे येथील मच्छीमार यांना संपर्क साधला.शेखर भिल हा तापी पुलाच्या खांबजवळील कठड्याजवळ पोहचला व तेथील पिलर वर चढला.त्याला तापी पुलावरुन पोलीस आणि ग्रामस्थांनी पिलरवरच थांबण्यासाठीचा सल्ला दिला.दुपारी १ वाजेच्या दरम्यान सावळदे येथील मच्छीमार हे आपल्या बोटीने शेखर पर्यंत पोहचले व शेखरला बोटीत बसवून पाण्याच्या बाहेर काढले. जवळपास ६ तास शेखर हा नदीपात्रात होता.शेखरला बाहेर काढल्यानंतर त्याला उपचारासाठी नरडाणा रुग्णालयात पोलीस घेऊन गेले.त्याची प्रकृती स्थिर असून आत्महत्येचे कारण मात्र त्याने सांगितले नाही.या संपूर्ण घटनेत “देव तारी त्याला कोण मारी’ ही म्हण मात्र सार्थ ठरली असेच म्हणावे लागेल.

WhatsApp
Follow by Email
error: