धुळे शहर जिल्हा काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ.अनिल भामरे नियुक्ती…

बातमी कट्टा: – धुळे शहर जिल्हा काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ.अनिल भामरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना जिल्हाध्यक्ष नियुक्तीचे पत्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील यांच्या हस्ते मुंबईत देण्यात आले.

दरम्यान त्यांच्या नियुक्तीमुळे धुळे शहरातील काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. याआधी डॉ.भामरे यांनी 2010मध्ये धुळे शहर काँग्रसेचे जिल्हाअध्यक्षपद यशस्वीपणे सांभाळले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि,धुळे शहर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद गेल्या काही महिन्यापासून रिक्त होते.अध्यक्षपदी सक्षम व कार्यशील,अनुभवी चेहरा मिळावा म्हणून महाराष्ट्र काँग्रेसकडून चाचपणी सुरु होती. अखेर धुळे शहरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ.अनिल जगन्नाथ भामरे यांची धुळे शहर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. डॉ.अनिल भामरे यांच्या रुपाने एक अनुभवी चेहरा शहर काँग्रेसला मिळाल्याने धुळे शहरातील काँग्रेसमध्ये उर्जितावस्था  निर्माण होणार आहे. डॉ.अनिल भामरे हे सन 1979 पासून विद्यार्थी दशेपासून काँग्रेसचे सक्रीय पदाधिकारी आहेत. त्यांनी जिल्हा युवक काँग्रेससह काँग्रेस पक्षाच्या विविध फ्रंटमध्ये जबाबदार्‍या सांभाळल्या आहेत. इंटकचे धुळे जिल्हाध्यक्ष आणि धुळे शहर जिल्हाध्यक्ष म्हणूनही डॉ.भामरे यांनी पक्षासाठी काम केले आहे. दरम्यान त्यांनी सन 2010 मध्ये धुळे शहर काँग्रेसचे अध्यक्षपद यशस्वीपणे सांभाळले आहे.निवडणूक काळात त्यांनी विविध जिल्हयात पक्ष निरिक्षक म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे. डॉ.अनिल भामरे यांचे राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य क्षेत्रात भरीव योगदान आहे. या विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी यशस्वीरित्या पदे सांभाळली आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षातील त्यांचा दांडगा अनुभव लक्षात घेता त्यांची पक्षश्रेष्ठींनी धुळे शहर जिल्हा काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे. आज दि. 19 सप्टेंबर रोजी मुंबईत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांच्या हस्ते डॉ.भामरे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र काँग्रेस कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील,माजी खा.बापू चौरे, माजी आ.डी.एस.अहिरे, माजी पं.स.सदस्य भगवान गर्दे, ज्येष्ठ नेते रमेश श्रीखंडे, बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र भदाणे, इंटक जिल्हाध्यक्ष प्रमोद सिसोदे,शकील अहमद, शरद गागुर्डे आदी उपस्थित होते.


काँग्रेस पक्ष मजबूत करणार-डॉ.अनिल भामरे- धुळे शहरातील काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी मेहनत घेतली जाईल. पक्षातील सर्वच कार्यकर्त्यांना सोबत घेवून धुळे शहर काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर टाकलेला विश्‍वास सार्थकी लावण्याचा  आटोकाट प्रयत्न करणार असल्याचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल भामरे यांनी आपल्या प्रतिक्रीयेत व्यक्त केले.

WhatsApp
Follow by Email
error: