बातमी कट्टा:- भरदिवसा घरफोडी करून घरातील लाखोंची रोकड चोरी झाल्याची धक्कादायक घटना काल दि 17 रोजी दुपारी घडली आहे.याबाबत घटनास्थळी पोलीस प्रशासनासह श्वान पथक दाखल झाले होते याबाबत अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील खर्दे येथे आरिफ बोहरी यांचा किराणा आणि बांधकाम साहित्य विक्रीचा व्यवसाय आहे.ते दि 17 रोजी गावातच दत्त मंदिरासमोर अपार्टमेंटमध्ये दुसऱ्या मजल्यावर राहतात. दुपारी ते कुटुंबासह नमाज अदा करण्यासाठी शिरपूर शहरातील मशिदीत गेले होते.ही संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटच्या लोखंडी दाराचे कुलूप तोडले.घराच्या मुख्यदाराचा कडीकोंडा तोडून घरातील कपाटातून रोकड चोरून नेली आहे.आरिफ बोहरी हे दुपारी घरी परतल्यानंतर हा प्रकार लक्षात आला.त्यांच्या मुलीचे लग्न ठरले असून त्यासाठी करावयाच्या खर्चापोटी त्यांनी काही रक्कम काढून आणली होती.चोरीबाबत माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र देशमुख घटनास्थळी दाखल झाले होते.घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण केले होते मात्र काही अंतरापर्यंत चोरट्यांचा माग दाखवून श्वान माघारी फिरला.याबाबत अद्यापपर्यंत शिरपूर शहर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल झालेला नव्हता.