बातमी कट्टा:- उधारी वसुलकरून मोटरसायकलीने येत असतांना तीन संशयितांनी मोटरसायकलीला थांबवत मारहाण करून 1 लाख 4 हजाराची रोकडसह कागदपत्रे असलेली बॅग लुटून संशयित फरार झाल्याची घटना घडली आहे.याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर चोपडा रस्त्यावर चोपड्याकडून शिरपूर कडे येणाऱ्या भगवंत गुलाबराव धनगर यांना मारहाण करून त्यांच्या कडील 1 लाख 3 हजारांची रोकडसह कागदपत्रे असलेली बॅग तीन संशयित घेऊन पसार झाले आहेत.
भगवंत गुलाबराव धनगर हे शिरपूर शहरातील एस जी गुप्ता होलसेल किराणा दुकानावर कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत.ते दर रविवारी उधारी वसुली करत असतात.यावेळी देखील ते उधारी गोळा करून एम.18 एए 2373 क्रमांकाच्या मोटरसायकलीने शिरपूर कडे येत असतांना तीन अज्ञात संशयितांनी त्यांच्यावर लक्ष ठेऊन त्यांना भाटपुरा गावाच्या हाकेच्या अंतरावर थांबवले व अचानक भगवंत धनगर यांना मारहाण करत त्यांच्या कडे असलेली बॅग हिसकावून ते मोटरसायकलीने तीनही संशयित चोपड्याच्या दिशेने फरार झाले.याबाबत भगवंत धनगर यांनी थाळनेर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल केला आहे.त्यांच्या म्हणण्यानुसार तीनही संशयिती 25 ते 30 वयोगटातील तरुण होते.त्यांच्या त्या बॅग मध्ये 1 लाख 4 हजार 126 रुपये व कागदपत्रे होती.याबाबत थाळनेर पोलीसांकडून संशयितांचा शोध सुरु आहे.