नंदुरबार, बातमी कट्टा ‘कोविड-19’ मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना व कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू होवून एकल, विधवा झालेल्या महिलांसाठी ‘मिशन वात्सल्य योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेचा पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय कृती दलाच्या अध्यक्षा मनीषा खत्री यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय कृती दलाच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी कृष्णा राठोड, जिल्हा विधी सेवा प्राधिकारणाचे सचिव डी. व्ही. हरणे, तहसीलदार भाऊसाहेब थोरात,डॉ.सुरेश कोळी, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष विठ्ठल कदम, शिक्षणाधिकारी डॉ. राहुल चौधरी, सहायक आयुक्त कौशल्य विकास रोजगार विजय रिसे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी साईनाथ वंगारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी संजय कोडार, आर. एफ. कुऱ्हे, पोलिस निरीक्षक भरत जाधव, दावलशा बाबा महिला उन्नती मंडळाच्या अध्यक्षा वंदना तोरवणे, चाइल्ड लाइनचे जिल्हा समन्वयक आशिष शेवाळे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती खत्री म्हणाल्या, मिशन वात्सल्य योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी तालुकास्तरीय समन्वय समिती स्थापन केली आहे. या समितीच्या माध्यमातून संबंधितांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवावा. ‘कोविड-19’ मुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात यावा. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांचा शिक्षणाचा हक्क अबाधित राहण्यासाठी कार्यवाही करावी. चाईल्ड हेल्प लाईन 1098 बाबतची माहिती नगरपालिका, नगरपरिषद क्षेत्रातील सर्व रुग्णालयात दर्शनी भागात लावावी. कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता विभागामार्फत ‘कोविड19’च्या प्रादुर्भावामुळे एकल, विधवा झालेल्या महिलांची नोंदणी करुन त्यांची आवड लक्षात घेवून त्यांना आवश्यकतेनुसार प्रशिक्षण देण्यात यावेत. ‘कोविड-19’ मुळे घरातील कर्ता पुरुष गमावलेल्या 63 महिलांना सामाजिक योजनांचा लाभ देण्यात यावा. उर्वरीत महिलांना सामाजिक योजनांचा लाभ देण्यासाठी त्रुटीची पुर्तता त्वरीत करावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
बालसंगोपन योजना जिल्ह्यात ‘कोविड-19’ मुळे दोन्ही पालक गमावलेल्या 7 मुलांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत व शैक्षणिक मदत देण्यास बैठकीत मंजुरी बाबत चर्चा करण्यात आली. ‘कोविड 19’मुळे एक पालक गमावलेल्या 247 बालकांपैकी 191 बालकांचे बाल संगोपन योजनेचे आदेश देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तर 20 बालकांचे प्रस्ताव बाल कल्याण समितीकडून नामंजूर करण्यात आले असून उर्वरीत 36 बालकांच्या कागदपत्रांची कार्यवाही सुरु आहे. त्यानंतर त्यांनाही बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. बैठकीस बाल कल्याण समितीचे सदस्य व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्याच्या हस्ते अनाथ प्रमाणपत्रांचे वाटप
‘कोविड 19’ मुळे दोन्ही पालक गमावलेल्या सहा बालकांना अनाथ प्रमाणपत्र, तर इतर कारणामुळे अनाथ झालेल्या 11 बालकांना अनाथ प्रमाणपत्राचे वाटप जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांच्या हस्ते करण्यात आले.