बातमी कट्टा:- मुंबईच्या तळोजा येथे दोन महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या ८ महिन्याचा बाळ शिरपूर शहरात एक मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या महिलेकडे कसे आले ? याबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात येत असून मुंबई तळोजा येथील पोलिस या प्रकरणाचा तपासासाठी शिरपूर शहरात दाखल झाले आहेत.
दि २९ रोजी दुपारी शिरपूर शहरात मद्यधुंद एक महिला फिरत होती.त्या महिलेकडे ७ ते ८ महिन्याचे बाळ होते.त्या महिलेला ओळखणाऱ्यांनी बघितले तेव्हा यापूर्वी ही महिला एकटी राहत होती मग अचानक हे लहान बाळ या महिलेकडे कसे आले ? असा प्रश्न त्यांना उपस्थित झाला.घटनेनंतर उपस्थितांनी त्या महिलेला बाळासह शिरपूर शहर पोलिस स्टेशन येथे आणून पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांनी महिलेची तपासणी केली असता महिला मद्यधुंद अवस्थेत आढळून आली. महिलेला बाळा संदर्भात विचारपूस केली असता वेगवेगळ्या पध्दतीचे उत्तर महिला देत होती.सदर बाळ हे त्या महिलेचे नसल्याची खात्री पोलिसांना झाली.पोलिसांनी सोशल मिडियावर त्या बाळाचा फोटो व्हायरल केल्यानंतर त्या बाळाची ओळख समोर आली.
मुंबई येथील तळोजा येथे असणारे दाम्पत्याने पोलिसांना फोन करुन ते बाळ त्यांचे असल्याची माहिती त्यांनी दिली.बाळाचे दाम्पत्य दुसऱ्या दिवशी शिरपूर शहर पोलिस स्टेशनात दाखल झाले.मात्र तोपर्यंत त्या बाळाला धुळे येथील शिशु गृहात दाखल करण्यात आले होते.तर ज्या महिलेकडे बाळ सापडले त्या महिलेला चोपडा मानव सेवा तिर्थ येथील दाखल करण्यात आले होते.शिरपूर पोलिसांच्या म्हणण्यानुसार डिएनए तपासणी नंतरच ते बाळ त्या दाम्पत्याच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
मुंबई तळोजा येथील या दाम्पत्याने दोन महिन्यांपूर्वी बाळ बेपत्ता झाल्याची तक्रार तळोजा पोलिस स्टेशनात दिली होती.याप्रकरणी तळोजा पोलिसांकडून तपास सुरु होता. मात्र बेपत्ता झालेले हे बाळ शिरपूर येथील एका महिलेकडे सापडल्याची माहीती मिळाल्यानंतर तळोजा स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अलका पाटील या पथकासह चोपडा येथील मानव सेवा तिर्थ येथे दाखल होत त्या संशयित महिलेला आणि संस्थेचे व्यवस्थापक नरेंद्र पाटील यांना सोबत घेत शिरपूर शहर पोलिस स्टेशन गाठले. त्या महिलेची चौकशी करण्यात येत असून महिलेकडून अद्याप ठोस माहिती मिळत नसल्याने दिवसभर तळोजा येथील पोलिस चौकशी करत आहेत. बाळाला घेऊन सदर महिला कुठे गेली त्या दिवशी कोणाकडे थांबली महिलेकडे असणारा मोबाईल कोणाकडे आहे ? मोबईल मध्ये काही पुरावा मिळतो का ? याबाबत रात्री उशिरापर्यंत तपास सुरु होता.