बातमी कट्टा:- बनावट नोटा छापणाऱ्या दोन संशयितांना शिरपूर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.संशयिताच्या राहत्या घरातून पोलीसांनी छापा टाकला असता बनावट नोटांसह प्रिंटर मशीन ,नोटांचे छपाई केलेले कागद,कोरे कागद व 2 लाख 29 हजार किंमतीच्या 500 रूपये दराच्या हुबेहूब दिसणारे 458 बनावट चलनी नोटा पोलीसांना मिळुन आले आहे.विशेष म्हणजे या बनावट नोटा छापणाऱ्या रॅकेटचा मास्टरमाईंड सिव्हिल इंजिनिअर असल्याचे उघड झाले आहे.
उच्च शिक्षित होऊन सिव्हिल इंजिनिअर म्हणवून घेणाऱ्या तरुणाने राहत्या घरी बनावट नोटा छापण्याचा व्यवसाय सुरु करत गावातीलच सराईत संशयिताला त्या बनावट नोटा बाजारात विक्रीसाठी दिल्याची माहिती शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना गोपणीय माहिती प्राप्त झाली होती.त्या माहितीच्या आधारे निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी शहर पोलीस स्टेशनच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले होते.
पोलीस उपनिरीक्षक किरण बार्हे,उपनिरीक्षक संदिप मुरकुटे,यांच्यासह शोध पथकातील लादुराम चौधरी,ललित पाटील,विनोद अखडमल,गोविंद कोळी,प्रविण गोसावी, मनोज दाभाडे,अनिता पावरा,नुतन सोनवणे,रोशनी पाटील, प्रतिभा देशमुख,आदी जण काल दि 6 रोजी दुपारी शिरपूर तालुक्यातील सावळदे येथील मिळालेल्या माहितीच्या घरी गेले.तेथे घराबाहेर सापळा रचत शिताफीने घरावर छापा टाकला.यावेळी धनंजय दिलीप कोळी या तरुणाच्या घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत शोकेस मध्ये प्रिंटर ठेवलेले दिसले.
शोकेसच्या खात्यात 500 रुपये दराच्या चलनी नोटांची छपाई केलेले 3 कागद हे शोकेस मधील प्रिंटर मधुन छपाई केले असल्याचे आढळून आले.धनंजय शिरसाठ(कोळी) याने काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारचे नोटांची छपाई केलेले बनावट नोटांचे कागद सावळदे गावातील मुकेश प्रल्हाद कोळी यास दिले असुन ते कागद कापुन नोटा लावुन त्या चलनामध्ये वापरत असल्याचे धनंजय शिरसाठ याने पोलीसांना सांगितले.पोलीसांनी तात्काळ मुकेश कोळी याच्या घरी छापा टाकला असता मुकेश कोळी याची अंगझडती घेतली असता त्याच्या शर्टाच्या खिशात एक मोबाईल व पँन्टचे डावे खिशात 500 दराच्या भारतीय चलनाच्या हुबेहूब दिसणार्या बनावट चलनी नोटांचे 2 बंडल पोलीसांना मिळुन आले.
मुकेश कोळीच्या घराची झडती घेतली असता त्यात इलेक्ट्रीक फिटींग साहित्य,खाली खोके,तसेच भारतीय चलनाच्या हुबेहूब दिसणारे बनावट चलनी नोटांचे दोन बंडल तसेच छपाई केलेल्या नोटांचे कागदांचे कापलेले तुकडे,तसेच कागद कापण्यासाठी लागणारे कटर व मोजमाप पट्टी असे साहित्य मिळुन आले.
दोन्ही संशयितांकडून 2 लाख 29 हजार किंमतीच्या 500 रुपये दराच्या बनावट चलनी नोटांसह ईतर मुद्देमाल शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने ताब्यात घेत रात्री गुन्हा दाखल केला आहे.धनंजय शिरसाठ (कोळी) हा सिव्हील इंजिनिअरींगच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे तर मुकेश कोळी हा सराईत गुन्हेगार असून याआधी देखील त्याच्यावर गुन्हे दाखल असल्याचे पोलीसांनी सांगितले आहे.