
बातमी कट्टा: मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार राज्यात राबविण्यात आलेल्या 100 दिवसीय कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात शिरपूर तालुक्याने उत्कृष्ट कामगिरी करत नाशिक विभागात आपला दबदबा निर्माण केला आहे. शिरपूर उपविभागीय अधिकारी कार्यालयाने विभागात द्वितीय क्रमांक पटकावला असून, शिरपूर तहसील कार्यालयाने तृतीय क्रमांक मिळवून उत्तम यश संपादन केले आहे.
याव्यतिरिक्त, शिरपूर-वरवाडे नगरपरिषदेने द्वितीय, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाने द्वितीय आणि बाल संरक्षण अधिकारी कार्यालयाने देखील द्वितीय क्रमांक मिळवला आहे. एकाच तालुक्यातील तब्बल पाच शासकीय कार्यालयांनी विभागीय स्तरावर अव्वल स्थान पटकावण्याची ही कामगिरी संपूर्ण महाराष्ट्रात एक दुर्मिळ उदाहरण ठरली आहे.
राज्य शासनाने प्रशासकीय विभागांसाठी निश्चित केलेल्या 100 दिवसांच्या कृती आराखड्यात संकेतस्थळ अद्ययावत करणे, नागरिकांचे जीवनमान सुकर करणे, कार्यालयीन स्वच्छता, अभिलेख व्यवस्थापन, तक्रार निवारण, सोयीसुविधा वाढवणे, अभ्यांगत भेटींचे नियोजन, ई-ऑफिस प्रणालीचा वापर, गुंतवणूकदारांना प्रोत्साहन आणि त्यांच्या अडचणींचे निराकरण, तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर, शिरपूर उपविभागीय अधिकारी कार्यालयाने अर्धन्यायिक प्रकरणांची सुनावणी ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला. यामुळे खेड्यापाड्यातील शेतकरी, ज्येष्ठ नागरिक आणि नोकरीनिमित्त दूर शहरांमध्ये असलेले नागरिक यांना कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज राहिली नाही. यामुळे त्यांच्या वेळेची आणि पैशांची बचत झाली आहे.
या कार्यालयाने आणखी एक उल्लेखनीय उपक्रम केला आहे.

पोलीस पाटील यांच्या सर्व सेवाविषयक माहितीसाठी ‘ऑनलाईन पोलीस पाटील सेवा अभिलेख प्रणाली’ (PPSR System) विकसित केली आहे. या प्रणालीची निवड नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्तांनी महाराष्ट्रातील उत्कृष्ट कार्यपद्धतीमध्ये केली आहे, हे विशेष उल्लेखनीय आहे.
नाशिक विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कार्यालयांना नुकतेच पुरस्कार जाहीर करण्यात आले, ज्यात शिरपूर तालुक्यातील या पाच कार्यालयांचा समावेश आहे. या यशानंतर शिरपूर तालुक्यात उत्साहाचे वातावरण असून, सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे.
शिरपूर उपविभागीय अधिकारी डॉ. शरद मंडलिक यांनी या उत्कृष्ट कामगिरीबद्दल तालुक्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
