
बातमी कट्टा:- तालुक्यातील सगळ्यात श्रींमत म्हणून ओळख असलेल्या ग्रामपंचायत हद्दीतील गावात स्वच्छतेची पार वाट लागलेली असतांना ग्रामपंचायत सदस्यांनी याबाबत वारंवार तक्रार करुनही संबधीत ग्रामसेवक व सरपंच यांच्याकडून दखल घेतली जात नसल्याने आज सदस्यांनी सरपंच यांच्या खुर्चीला निवेदनाची प्रत लावून गावातील समस्यांकडे लक्ष वेढले आहे.सरपंच व ग्रामसेवक यांनी समस्याचे निराकरण केले नाही तर जन आंदोलन छेडण्याचा ईशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

शिरपूर तालुक्यातील दहिवद ग्रामपंचायतचे सदस्य मयूर देवेंद्र राजपूत यांच्यासह दिपक वसंतराव चव्हाण,संभाजी रामदास सुर्यवंशी,धाकलु कृष्णा गवळी,सौ.ताराबाई सुरेश कोळी आदींनी दहिवद येथील आरोग्य समस्या व पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविणेबाबत गटविकास अधिकारी, ग्रामसेवक अधिकारी यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले की, शिरपूर तालुक्यातील सर्वाधिक मोठ्या व सर्वाधिक उत्पन्न असलेल्या ग्रामपंचायतीपैकी दहिवद ग्रामपंचायत आहे.मात्र गावात पाणीच्या साम्राज्यासह पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्याकडे लक्ष वेधण्याचा अनेकदा प्रयत्न केला.मात्र याकडे सोयिस्कर दुर्लक्ष केल्यामुळे सदर प्रश्न कायम असून परिणामी पुन्हा एकवेळा लेखी निवेदन देणे भाग झाले.शिरपूरकडून दहिवदमध्ये येतांना प्रवेशद्वाराजवळ भलामोठा उकिरडा आहे. विशेष म्हणजे प्राप्त माहितीनुसार,मा.सरपंच महोदयांच्या मालकीच्या जागेजवळच हा उकिरडा आहे.

घंटागाठी आमच्याकडे येत नसल्याने कचरा आणखी कुठे टाकू असे स्थानिकामधून सांगितले जाते.गावात प्रवेश करतांनाच उकिरडाचे दर्शन घडते.मात्र याबाबत फारसे गांभीर्य नाही असेच दिसून येते.दहिवदच्या आरोग्य केंद्रासमोर शेणाचा ढीग आहे. ही बाब तर संपूर्ण गावाला लाज आणणारी आहे.दिवसेंदिवस शेणाची भर पडून उकिरडा वाढतो आहे. पण त्याचे काहीच वाटत नाही.याच केंद्रात गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया होतात, कोविड लसीकरण होते.ग्रामस्थांना नाक दाबून केंद्रात प्रवेश करावा लागतो,दहिवद गावातील वॉर्ड नं. दोनमध्ये अनेक दिवसापासून पाणीपुरवठ्याची गंभीर समस्या आहे.त्याबाबत विचारले असता,दुरुस्तीसाठी माणसे मिळत नाही,त्यांना द्यायला पैसे नाहीत अशी भयानक उत्तर सांगितले गेले.

धुळे जिल्ह्यातील सर्वाधिक विकसित टेक्सटाइल पार्कमधल्या शेकडो कंपन्या ज्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात आहेत. त्या ग्रामपंचायतीला पैशांची चणचण भासावी हे हास्यास्पद आणि आणि लाजिरवाणे आहे.भर उन्हाळ्यात वॉडतील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.गावातील घाणीचे आणि पाण्याचा प्रश्न युद्धपातळीवर सोडवावा,अन्यथा येत्या काळात जनआंदोलनासह विविध मार्गांनी आंदोलने उभारली जातील असा ईशारा सदस्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.सदर निवेदन दहिवद गावाचे सरपंच यांच्या खुर्चीवर ठेवण्यात आला व शिरपूर गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवक यांना प्रत देण्यात आलेली आहे.
