बातमी कट्टा:- चटणी म्हणजे मराठी स्वयंपाकाची आन, बान अणि शान.. चटणी वापरत नसेल असं एकही घर मराठी मुलखात शोधून सापडणार नाही. चटणी,मसाले टाकून तयार केलेला तिखटजाळ रस्सा पिण्याच्या पैजा लावणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य असावे..
तर मंडळी, चटणीला खान्देशात अधिकच महत्व आहे. कितीही रेडिमेड आकर्षक पाउचमधील मसाले, चटणी येऊ द्या, बारमाही पुरेल इतकी चटणी जिच्या घरात असेल तीच खरी सुगृहिणी असे म्हटले जाते..तर बघूया चटणीची लालभडक आणि चवदार कहाणी.
मसाल्याचा प्राण असलेली चटणी बनवण्यासाठी लागते मिरची…आता मिरची म्हटली की आठवते नंदुरबार आणि दोंडाईचा…पण एक मिनिट थांबा..आता शिरपूर एक नवा फंडा घेऊन स्पर्धेत उतरलं आहे..तुम्ही मिरची विका…आणि शिरपूरकर विकताहेत मिक्स मिरचीची लाजवाब चटणी…या चटणीची ख्याती इतकी पसरली आहे की जळगाव जिल्ह्यातून गृहिणी शिरपूरच्या चटणीची खरेदीसाठी येत आहेत…
शिरपूरला अनेक ठिकाणी मिरची विकली जात असली तरी बाजार समितीमधल्या मिरचीची खासियत काही औरच आहे. या ठिकाणी तुम्ही फक्त चटणी किती तिखट हवी तेवढं सांगायचं..मिरची विक्रेत्यांकडचे एक्सपर्ट तुम्हाला तशा प्रमाणात मिरची मिक्स करून देतात..शंकेश्वरी, बेडगी, काश्मिरी, चपाटा, फाफडा, रसगुल्ला आणि सर्वात अखेर गावरान मिरची….केवळ एकत्र करूनच नव्हे तर ती शास्त्रशुद्ध पद्धतीने दळून तिला तेल लावून पॉलिश करून मिळते. ही लालभडक चटणी पाहूनच तोंडाला पाणी सुटते. तिची चवही अगदी न्यारी..शिवाय वर्षभरात ना तिचा रंग जातो ना चव बदलते…मग या तर शिरपूरच्या मिरची बाजारात आणि दरवळू द्या आपल्या किचनमध्ये चटणीची खुमारी…!