बातमी कट्टा:- तहसील कार्यालयात जप्त असलेला ट्रक सोडण्याकरीता मंडळ अधिकारी यांनी एक लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती.अखेर(पहिला हप्ता) ७० हजार रुपयांची लाच स्विकारतांना मंडळ अधिकारी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार आज दि २७ रोजी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे पथकाने नंदुरबार येथील तहसील कार्यालय गेटवर सापळा रचला होता. तक्रादार यांचा गौण खनिज वाहतूकीचा व्यवसाय असून त्यांचा वाळूने भरलेला ट्रक नंदुरबार तालुक्याचे मंडळ अधिकारी प्रशांत निळकंठ देवरे वय ३७ यांनी नंदुरबार शहरातील करण चौफुली येथे अडवून तहसील कार्यालय येथे दि २१/२/२०१९ रोजी जमा केला होता.
सदरचा ट्रक सोडून देण्याकरिता मंडळ अधिकारी प्रशांत देवरे यांनी तक्रारदार यांच्याकडे दि २७ रोजी पंचासमक्ष एक लाख रुपये लाचेची मागणी करुन त्यापैकी पहिला हप्ता ७० हजार रुपयांची लाचेची रक्कम तहसील कार्यालय नंदुरबार च्या गेट समोर स्वीकारतांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.
सदरची कारवाई अनिल बडगुजर पोलीस उप अधीक्षक धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे,राजन कदम,शरद काटके,संतोष पावरा, रामदास बारेला,भुषण शैटे,भुषण खलाणेकर, गायत्री पाटील, वनश्री बोरसे,प्रशानत बागुल,मकरंद पाटील, जगदीश बडगुजर, सुधीर मोरे यांनी केली आहे.